सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील असे जागतिक वारसा स्थळ आणि विविध रंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुले बहरण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच येथील फुलांच्या महोत्सवास प्रारंभ झाला आहे. कास पठारावर खरी दुर्मिळ, रंगबिरंगी फुलांची रंगाची उधळण पाहायला मिळणार आहे. ही अद्भुत डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी ही कास पठारावर नैसर्गिक रंगबिरंगी रानफुलांच्या कळ्या पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
सध्या जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या कास पठारावर फुलांची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. अधून मधून येणारा पाऊस, दाट धुक्याची चादर आणि थंडगार वाहणारे वारे या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातून त्याचबरोबर देशभरातून आणि विदेशातून पर्यटक कास पठाराकडे येऊ लागले आहेत. कास पठारावर अनेक फुलांच्या प्रजाती उमलल्या आहेत.
ऑक्टोबर महिन्यादरम्यान कास पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी, आषाढ बाहुली, गजरा अमरी, पवेटा इंडिका, सापकांद्याची फुले बहरत आहेत. पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फुलही दिसू लागले आहे.
तृण, कंद, वेली, तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल अशा विविधरंगी फुलांचा मोठा बहर येण्यास सुरुवात झाली आहे. हा बहर बघण्यासाठी पर्यटकांची पाऊले आता साताऱ्यातील कास पठाराकडे वळू लागले आहेत.
कास पठारावर कसे पोहचाल?
सातारा शहरापासून 25 किमी, महाबळेश्वरपासून 37 किमी आणि पाचगणीपासून 50 किमी अंतरावर कास पठार हे अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता लक्षात घेता, UNESCO ने 2012 मध्ये याला जागतिक नैसर्गिक वारसा असलेले स्थळ म्हणून घोषित केले आहे. पुण्यापासून सुमारे 140 किमी अंतरावर असलेल्या या पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आकर्षक फुले येतात.