सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासच्या पठारावर अनेक रंगीत फुले ही उमलू लागली आहेत. हजारो पर्यटकांच्या मनावर राज्य करणारे कास पुष्प पठारावर पावसाळ्यात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली असून शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने कास पठार व कास तलाव परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.
शनिवार, रविवार अशा सलग सुट्ट्या जोडून आल्याने कासचे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उत्तेश्वर घाटापासून कास पठार, कास तलावापर्यंत पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होत आहे. कास, बामणोली परिसरात अधून मधून रिमझिम पडणारा पाऊस यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ओढे व झरे वाहू लागले आहेत. कास पुष्प पठार, कास तलाव या परिसरात वातावरण अल्हाददायक बनले आहे. सुट्टीचा आनंद निसर्ग अनुभवून पर्यटकांनी घेतला. कोयना धरण शिवसागर जलाशयाची पाणी पातळी खालावल्याने बोटिंग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. मात्र, या परिसरामध्ये फिरायला जाणारे पर्यटक हे निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
असे आहे कासचे वैशिष्ट्य
कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे. कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात.