सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराने यंदा स्वर्गीय फुलांचा खास शालू पांघरायला लवकर सुरुवात केली आहे. कासवरील कुमदिनी तलाव पावसाने भरला आहे; तर सभोवतीचे पूर्ण पठार हिरव्यागार झाडा-वेलींनी बहरून गेले आहे.
गेंद, भुई कारवी, चवर, वायुतुरा (सातारी तुरा), पंद पिंडा कोकंणांसीस, विघ्नहर्ता (हलुडा) अशी रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता कासचे वेध लागले आहेत. भुईकारवी ही जमिनीवर टोपलीसारखा आकार असणारी फुले आहेत. याच्या पानांना छोटे पांढरट रंगाचे केस असतात. सूर्याचे किरण पडल्यावर सुंदर व मोहक दिसतात. पठारावर आता त्यांचा नजारा सुरू झाला आहे.
धनगरी फेट्याप्रमाणे गवताच्या दांड्यावर टोपीसारखा भाग असणारी गेंद ही फूल वनस्पती आहे. यामध्ये तीन जाती आहेत. सीतेची आसवे, धनगर गवत, तेरडा याचे एकत्रित फुललेले द़ृश्य पर्यटकांसाठी पर्वणी असते. ही फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे.