जिल्ह्यात होणार आता दुसरे नवीन महाबळेश्वर; प्रारूप विकास योजनेला लवकरच होणार सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा भीमा आणि कृष्णा नदींच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. हा जिल्हा विविध प्रकारच्या भूभागांनी बनलेला असून आल्हाददायक हवामान ,जंगले इ.चा परिणाम जिल्ह्याच्या भौतिक परिस्थितीवर बघावयास मिळतो. सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा ,शिखरे आणि उंच पठारांनी वेढलेला आहे. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणा शेजारीच नवीन महाबळेश्वर गिरीस्थान निर्माण करण्याच्या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आलेले आहे.

या प्रकल्पातील २३५ गावांपैकी ५८ गावांचा बेस मॅप आणि भूवापर नकाशा तयार झाला आहे. तर उर्वरित १७७ गावांचा लिडार सर्व्हे आणि जमीन पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता संपताच आता प्रारूप विकास योजना तयार करण्याच्या कामाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) सुरुवात केली जाणार आहे.

सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा पठारांनी वेढलेला जिल्हा

सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा ,शिखरे आणि उंच पठारांनी वेढलेला आहे. या पर्वत रांगांची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फुट आहे. तसेच फलटण तालुक्यातील नीरा नदीच्या खोऱ्या पासूनची उंची हि समुद्रसपाटीपासून १७०० फुटांपेक्षा जास्त आहे. हवामानाच्या बाबतीत महाबळेश्वर तालुक्याचा प्रभाग अधिक पाऊस पडणाऱ्या विभागात येतो.तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६००० मिमी असून माण व खटाव चा विभाग हा कोरड्या क्षेत्रात येतो.व तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ५०० मिमी आहे.जिल्ह्यातील पश्चिमेकडील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण पावसाळी जंगले आहेत तर पूर्वेकडील इतर भूभाग हा खुरट्या झुडपांनी व्यापलेला आहे.

नवीन महाबळेश्वर प्रकल्पात ‘या’ गावांचा समावेश

नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा जिल्ह्यातील चार तालुक्यातील गावाचा समावेश केला जाणार आहे. कोयना बॅक वॉटर आणि परिसरातील तब्बल २३५ गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर बसविले जाणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश नवीन महाबळेश्वर प्रकल्पात करण्यात आला आहे.