सातारा प्रतिनिधी | धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, तसेच आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी जावली तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार (दि.१८) जावली तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मोर्चासाठी मेढा येथे दाखल व्हावं, असे आवाहन मोर्चाच्या संयोजकांकडून करण्यात आले आहे.
गेल्या ७५ वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. तसेच शासनाने अनेक वेळा आश्वासने देऊन धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे सकल धनगर समाजाकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच आरक्षणाची अंमलबजावणी करून एसटीचे प्रमाणपत्र वितरित करावे, राज्य शासनाने एक हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
◻️’या’ आहेत प्रमुख मागण्या..
१) धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करावी.
२) जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
३) मेंढपाळांना शस्त्र परवाने द्यावे, मेंढ्यांना चरण्यासाठी वने राखीव ठेवावी.
४) शेळी मेंढी विकास महामंडळास दहा हजार कोटींचा निधी देण्यात यावा.
५) प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतीगृह उपलब्ध करून द्यावे.
६) आरक्षण लढ्यात शहीद झालेल्या समाज बांधवांच्या कुंटूंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी.
७) शासनामार्फत सवलतीच्या दरात कर्ज द्यावे.
८) सर्वच क्षेत्रातील खासगीकरण रद्द करावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.
असा निघणार मोर्चा..
धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने सोमवार (दि.१८) सकाळी ११ वाजता जावली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा नवीन बस डेपो येथून सुरू होऊन वेण्णा चौक, मेढा बाजार चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकणार आहे.
मोठ्या संख्येने उपस्थित राहा..
धनगर समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी व रेंगाळलेल्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी मेढा येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी तसेच महिला, युवक, युवतींनी या मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धनगर आरक्षण समितीचे शिवाजीराव गोरे यांनी केले आहे.