जेवण चांगले केले नाही म्हणून आजीला जाळले; नातवाला जन्मठेपेची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जेवण चांगले केले नाही म्हणून थेट नातवाने अंगावर रॉकेल ओतून आजीला जाळून मारल्याची घटना सातारा तालुक्यातील राजापुरी येथे घडली होती. या प्रकरणी नातवाला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी ही शिक्षा सुनावली.

शरद बजरंग साळुंखे (वय ३६, रा. राजापुरी, ता. सातारा) असे शिक्षा झालेल्या नातवाचे नाव आहे. गीताबाई मारुती साळुंखे (वय ७८) असे मृत आजीचे नाव आहे. ११ सप्टेंबर २०१९ ला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला होता. दुपारी “तू जेवण चांगले का केले नाहीस? असे म्हणत शरद याने चुली शेजारील रॉकेलच्या बाटलीतील रॉकेल आजीच्या अंगावर ओतले. त्यानंतर काडीपेटीची काडी पेटवून आजीला पेटवले. यात त्या गंभीररीत्या भाजल्या होत्या.

गीताबाई यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी दिलेल्या जबाबानुसार शरद साळुंखेवर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. व्ही. हंकारे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायाधीश जोशी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.

सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता वैशाली पाटील यांनी यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला. खटल्या दरम्यान दहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश जोशी यांनी शरदला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच साक्षीदार सतीश राघू साळुंखे याने खोटी साक्ष दिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरकारी वकिलांना उपअधीक्षक राजीव नवले, निरीक्षक नीलेश तांबे, पैरवी अधिकारी शीतल भोसले, शुभांगी वाघ, प्रॉसिक्युशन स्कॉडचे उपनिरीक्षक सुनील सावंत, सहायक फौजदार शशिकांत गोळे, अरविंद बांदल, हवालदार गजानन फरांदे, रहिनाबी शेख, अमित भरते यांनी सहकार्य केले.