कोतवालाला मारहाण केली म्हणून कोर्टाकडून एकास सुनावली 90 दिवसांची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितल्याच्या कारणावरून कोतवालाला शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याप्रकरणी फिरोज गणी मुजावर (रा. पाडळी-केसे, ता. कराड) याला तीन महिने कारावास आणि 2.5 हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांनी ठोठावली.

याबाबत माहिती अशी की, कोरोना कालावधीत 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी 10 च्या सुमारास पाडळी येथे ग्रामपंचायतीसमोर भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत ग्रामपंचायतीकडून आवाहन करण्यात आले होते. याबाबत गावचे कोतवाल ग्रामस्थांना आवाहन करत असताना, फिरोज मुजावरने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. त्याने विक्रेत्याजवळ जाऊन भाजी खरेदी केली. कोतवालाने त्याला नियम पाळण्याबाबत सुनावले असता, त्यानंतर फिरोजने कोतवालाला शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की केली. यामध्ये कोतवाल जखमी झाले होते. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याच्या सुनावणीत सहाय्यक जिल्हा सरकारी वकील एस. व्ही. कुलकर्णी यांनी आठ साक्षीदार तपासले. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी. टी. पाटील यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी फिरोज मुजावरला तीन महिने साधा कारावास, अडीच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. हवालदार एस. बी. खिलारे, ए. के. मदने यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.