सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील गोडवलीमध्ये विहिरीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू झाला. काल शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून तानाजी आबाजी मालुसरे (वय ५८) असे त्या ठेकेदाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोडवली या गावातील तानाजी आबाजी मालुसरे (वय ५८) हे गेल्या अनेक वर्षांपासून विहीर खोदणे, गाळ काढणे अशी विविध कामे करत होते. गोडवली गावात विहिरीचे काम चालू असताना शनीवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा पाय अचानक घसरला. यामध्ये त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत कोसळले. त्यांचे डोके, हात, पायाला व इतर ठिकाणी मार लागल्याने बेशुद्ध पडले. त्यानंतर तातडीने तेथील कामगार व गावकऱ्यांनी जखमी झालेल्या तानाजी मालुसरे यांना पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी ते औषधोपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले.
शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गोडवली येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची फिर्याद पाचगणी पोलिस ठाण्यात किशोर सुरेश मालुसरे यांनी दिली आहे.याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. मालुसरे हे गावातील सामजिक कार्यकर्ते होते. तानाजी मालुसरे हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी व एक विवाहित मुलगा असा परिवार आहे. पाचगणी पोलीस ठाण्याचे हवालदार श्री. रसाळ अधिक तपास करीत आहेत.