सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळे विकासाच्या 381.56 कोटी रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे प्रतापगड येथील संवर्धनाच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने दि. 8 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिली. त्यानंतर दि. 22 फेब्रुवारी, 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता देवून शासनाने दि. 05 मार्च, 2024 रोजी आराखडा मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला. त्यानुसार पुढील स्थळांच्या ठिकाणी प्राप्त रक्कम रु. 381.56 कोटींची करावयाच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली.
सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास आराखडा रु. 44.49 कोटी, कोयना हेळवाक वन झोन अंतर्गत कोयना नदी जलपर्यटन आराखडा रु. 22 कोटी, प्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन रु. 127कोटी 15 लाख, श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखडा रु. 187 कोटी 42 लाख रुपयांचा तयार करण्यात आला. या
आराखडयातील उपरोक्त कामांपैकी प्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन करण्याच्या रक्कम रुपये 127 कोटी 15 लाखांच्या कामांपैकी शासन मंजुरीनंतर आठ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करून रु. 27 कोटी एक लाखाच्या या कामास दि. 14 मार्च 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग पुणे यांच्यामार्फत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. थोड्याच दिवसात सदर कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.