सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापले होते. आता मतदान झाल्याने मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना जिल्ह्यात थंडी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरू लागला असून हवेत गारठा वाढल्याने उबीसाठी जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी, कष्टकरी वर्गाला थंडीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या शेकोट्यात राजकीय गप्पा चांगल्याच रंगू लागल्या आहेत.
यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने दिवाळीपर्यंत थंडीचा मागमूसही नव्हता. मात्र भाऊबीजेपासून जिल्ह्याला थंडीची चाहूल लागली. मात्र अवकाळी व ढगाळ हवामानाने काही काळ वातावरणात बदल झाला होता. कधी कडक ऊन तर कधी ढगाळ हवामान, पावसाची शक्यता अशा विचित्र हवामानाचा सामना जिल्हावासीय करत होते. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढला आहे. तापमानाचा पारा घसरला आहे. पहाटे बोचरी थंडी लागत असून दुपारी कडक ऊन तर सायंकाळी शीत लहरी वाहत असल्याने हवेत गारठा वाढला आहे.
त्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. बुधवारी सातारा शहराचे तापमान किमान १४ तर कमाल २९.२ तर महाबळेश्वरचे किमान १३.२ व कमाल २६ अंश इतके नोंदवण्यात आले. तापमानाचा पारा खाली घसरल्याने सातारकर चांगलेच गारठले. घटत्या तापमानामुळे वाढलेल्या थंडीचा रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी कष्टकरी वर्गाला सामना करावा लागत आहे. जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून संरक्षण केले जात आहे.
शेकोट्यांभोवती रंगू लागल्यात राजकीय चर्चा
थंडी वाढल्याने शहरी तसेच ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. अनेकजण या शेकोटीभोवती जमत असून गप्पांचा फड रंगू लागले आहेत. शेकोटीची धग वाढेल तशा गप्पांमध्ये रस वाढतो. सध्याच्या वातावरणामध्ये शेकोटीभोवती राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी निकालासाठी दोन दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. अनेकजण आपले तर्क-वितर्क लढवू लागले आहेत.
थंडीमुळे शारीरिक तक्रारी
– सर्दी, खोकल्यासह फ्ल्यूचा त्रास
– दमा, ॲलर्जीचा त्रास, श्वसनविकार
– सांधेदुखी, आर्थ्रायटिस
– रक्तवाहिन्यांचे आकुंचन होऊन रक्तदाब वाढणे
– ड जीवनसत्वाची कमतरता
काळजी काय घ्यावी?
– उबदार कपडे परिधान करावेत.
– थंडीपासून संरक्षण स्वत:चे करावे.
– वातानुकूलन यंत्रांचा वापर टाळा.
– नियमितपणे व्यायम करा.
– शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या.
– त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा.