सातारा प्रतिनिधी | सध्या सर्वत्र झपाट्याने होत असलेल्या आधुनिकी करणामुळे प्राणी- पक्ष्यांच्या अधिवासावर विपरीत परिणाम झाला आहे, असा निष्कर्ष काढला जातो. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील गावागावात आणि परिसरात विविध जातींच्या पक्ष्यांचा वावर वाढला असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात पक्ष्यांची संख्या जादा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागात अजूनही नैसर्गिक वातावरण टिकून आहे. साधी घरे, झाडे झुडपे, पाणवठे, गवताळ राने, जंगले आदी बाबी पक्ष्यांच्या जीवन क्रियेसाठी पोषक असतात. ग्रामीण भागात पक्ष्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक उपलब्ध असल्याने प्रत्येक गावखेड्यात चिमणी, कावळा पोपट, साळुंखी, भांगपाडी मैना, तारवाली ठिपकेवाला मुनिया, लालबुड्या बुलबुल, लालगाल्या बुलबुल, कबूतर असे अनेक पक्षी मोठ्या संख्येने दिसत आहेत, तर गाव खेड्यांच्या परिसरात मोर, लांडोर, हळद्या, शिक्रा, घार, कोतवाल, बगळा, बदक, भारद्वाज, चंडोल, रातवा, घुबड, तांबट, टकाचोर, टिटवी, गरुड, ब्राम्हणी घार, शेकाट्या, डोंबारी, सुगरण, भोरड्या, हिरवा राघू, कोकीळ, पावशा, करढोक, सारस असे रानपक्षीही नजरेस पडत आहेत.
ग्रामीण भागात पक्ष्यांची संख्या चांगली असल्याने गावात, तसेच गावाबाहेर विविध पक्ष्यांचा किलबिलाट नित्यनेमाने ऐकायला मिळतो. चिमण्यांच्या चिवचिवाटाने सकाळ होते. पक्षांच्या सहवासातील हे वातावरण अनेकांना भावते व आनंद देऊन जाते. ग्रामीण भागात झाडांची संख्या चांगली असल्याने पक्षांना घरटे बांधण्यासाठी जागा सहज उपलब्ध होते. पाणवठ्यांच्या परिसरात पानपक्ष्यांची संख्या चांगली असल्याचे पाहायला मिळत आहे. या पुढच्या काळातही प्राणी पक्ष्यांच्या अधिवासावर आघात झाला नाही, तर मानवाचे हे सोबती पुढील काळातही चांगल्या संख्येने दिसून येतील. निसर्गचक्र सुरळीत चालण्यास मदत होईल. निसर्गातील अन्नसाखळीचे चक्र हे सुरळित चालले तर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.