कराड प्रतिनिधी । मसूर परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मसूरच्या मुख्य चौकात चारही दिशेला लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, ते सध्या अनेक दिवसांपासून बंद असून नादुरुस्त आहेत. चौकात बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे हे शोपीस बनून राहिले आहेत.
मसूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आणि चोरीच्या घटनांना आळा बसून घटना कॅमेरात कैद व्हाव्यात यासाठी तत्कालीन सपोनी मालोजीराव देशमुख यांनी लोकसहभागातून मसूरच्या जुन्या बस स्थानक चौकात चारही दिशेला सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा लोकहिताचा निर्णय घेतला होता. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. मात्र, अलीकडल्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याने कोरीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. चोरीच्या घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून पर्यटन केले जात आहेत. मात्र, बंद सीसीटीव्ही कॅमेरे दुरूस्त करून ते पुन्हा सुरू करणे गरजेचे आहेत.
मसूर ही कराड तालुक्यातील उत्तर विभातील महत्त्वाची आणि मोठी बाजारपेठ म्हणून लौकिक आहे. मसूर हे मल्हारपेठ, पंढरपूर व खंडाळा शिरूर राज्य मार्गावर असल्याने ते एक दळणवळणाचे प्रमुख केंद्रस्थान बनले आहे. उंब्रज, कोरेगाव, कराड, पंढरपूर याबाजूकडे गुन्हेगारांना पळून जाण्यास हा पर्यायी खुष्कीचा मार्ग आहे. त्यातच डेंजर झोन म्हणून ओळखला जाणारा शामगाव घाट येथून काही अंतरावरच आहे. याच चौकातून टोल चुकून जाणारी वाहनांची कायम वर्दळ असते.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर या सर्व गोष्टीवर असल्याने त्या सर्व यापूर्वी कॅमेराबद्ध होत होत्या. त्यामुळे प्रत्येकजण सीसीटीव्ही कॅमेऱ्याची धास्ती घेत होते. या चौकात लहान मोठे होणारे वाद, माऱ्यामाऱ्या याला चांगला आळा बसत होता. विशेष म्हणजे सडक सख्याहरीने या कॅमेऱ्याची चांगलीच जास्ती घेतली होती.
पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक
या मुख्य चौकात शेकडो प्रकारची व्यवसायिकांची दुकाने आहेत. मसूरची मुख्य बाजारपेठ आहे 60-70 दुकान गाळ्यांचे शॉपिंग सेंटर ही या मुख्य चौकातच आहे. सध्या मसूर दूरक्षेत्राचे मसूर पोलीस ठाणे झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी वर्गही वाढला आहे. त्यामुळे मसूर सारख्या नीम शहरी गावात पोलिसांनी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सातत्याने नादुरुस्त आणि बंद असणे ही खूप गंभीरबाब आहे. मसूर पोलिसांनी लोकसहभागाचा आदर राखून बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी पूर्ववत करावेत, अशी मागणी होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा सुरु करणे आवश्यकच…
मसूर हे 35 ते 40 गावांची प्रमुख व्यापारी केंद्र असलेली निमशहरी गाव आहे. येथे विविध स्थानिक व बाहेरील व्यावसायिक आहेत. तसेच बँका, पतसंस्था ,दवाखाने, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सराफी दुकाने, होलसेल व्यापारी, मोबाईल, किराणा सह विविध व्यवसायांचे जाळे आहे. स्टँड,, जुना चौक, झेंडा चौक, व्यापारी बाजारपेठ ,शेंबडे चौक , हिंदुराव आबा चौक, स्वर्गीय युवराज पाटील चौक, चावडी चौक ,शालेय परिसर अशा महत्त्वपूर्ण केंद्रस्थानी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा असण्याची नितांत गरज आहे.