सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसापासून महाबळेश्वर पाचगणीमध्ये पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसामुळे या दोन्ही पर्यटनस्थळांना मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देण्यासाठी येत आहे. दरम्यान, महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाणाऱ्या घाटमार्गावर साचत असलेल्या दाट धुक्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अडचणी येत आहे. या दरम्यान, महाबळेश्वर तापोळा रोडवरील भारत हॉटेल जवळ दाट धुक्याचा अंदाज न आल्याने एक कार थेट सुमारे २० फुट दरीत जाऊन कोसळली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तापोळा रोडवरील भारत हॉटेल जवळ दाट धुक्याचा अंदाज न आल्याने एक कार क्रमांक (MH 47 BK 3540) थेट सुमारे २० फुट दरीत जाऊन कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० दरम्यान घडली. कार पलटी झाली तेव्हा कारमधून चालक रमेश सांळुखे (रा. इस्लामपुर) यांच्यासह एक पुरुष, दोन महिला व तीन लहान मुले प्रवास करत होत्या.
पाऊस व दाट धुके असल्याने भारत हॉटेल पुढे महाबळेश्वरकडे येत असताना वळणाचा अंदाज न आल्यामुळे त्यांची कार दरीत जाऊन कोसळली. कार दरीत कोसळल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांनी संबंधित कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढली. या मदत कार्यात महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस जितेंद्र कांबळे व सलिम सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.