उपोषण मागे घेण्याची पालकमंत्र्यांची विनंती धुडकावली; सोमवारी धनगर बांधवांकडून ‘माण’ बंदची हाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दहिवडी तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाचे उपोषण सुरू आहे. हे उपोषण मागे घ्यावे, ही पालकमंत्र्यांनी पत्राद्वारे केलेली विनंती धुडकावून लावत उपोषणकर्त्यांनी सोमवारी माण तालुका बंदची हाक दिली आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दहिवडी तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाचे उपोषण सुरू आहे. शनिवारी दुपारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे पत्र उपोषणकर्त्यांना देवून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र ती धुडकावण्यात आली.

पालकमंत्र्यांचे पत्र म्हणजे धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे मत धनगर समाजाने व्यक्त केले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीचा वृत्तांत त्या पत्रात होता. आमची मागणी अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची नसून असलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची आहे, हे त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे, अशा संतप्त भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केल्या.

पालकमंत्र्यांविरोधात तीव्र संताप

पालकमंत्र्यांनी आमची बोळवण करून तोंडाला पाने पुसण्याचा जो प्रकार केला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. पालकमंत्री सातारवरुन दहिवडीला येवू शकत नसतील तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नाही, असा तीव्र संताप उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनाची धग वाढविण्याचा निर्णय

दरम्यान, सायंकाळच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलंडे, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने ही चर्चा निष्फळ ठरली. एकंदरीत सरकारची भूमिका समाजाप्रती सकारात्मक नसल्याने आंदोलनाची धग वाढविण्याची गरज असल्याची भूमिका सकल धनगर समाजाने घेतली आहे.

… तर सोमवारी माण तालुका बं

पालकमंत्र्यांनी दहिवडीत येवून उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही तर माण तालुका सोमवारी बंद ठेऊन फलटण चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणे, विष प्राशन करणे, रस्त्यावर चूल मांडणे, चक्का जाम करणे अशा विविध पध्दतीने आंदोलनाची धग वाढविणाय असल्याचेही धनगर बांधवांनी सांगितले.