सातारा अप्रतिनिधी । चक्क पुलाला अचानक भगदाड पडल्याने पुलावरील गाडी त्या भगदाडात तोंडाकडून अर्धी घुसून अडकल्याने आतील दोन प्रवासी वाचल्याच्या घटना सातारा जिल्ह्यातील तापोळा भागातील तापोळा-कळमगाव-देवळी मार्गावर घडली.
याबाबत अघिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील तापोळा भागातील तापोळा-कळमगाव-देवळी रस्त्यावरून वेळापूर येथील राहणारे आनंद सपकाळ आपल्या पत्नीसह खासगी वाहनातून मुंबईकडे निघाले होते. गाडीतून दोघेच प्रवास करत होते. गाडी देवळी गावच्या ओढ्यावर आली असता, ओढ्यावर असलेल्या जुन्या पुलावरून जाताना अचानकच पुलाला भगदाड पडून गाडी तोंडाकडून आत भगदाडात गेली. नशीब चांगले म्हणून गाडी निम्यावरच अडकली. पुढील सीटवरून आनंद सपकाळ आणि पत्नी दोघेही गाडीतून मागच्या सीटवर जात गाडीतून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी देवळी गावात जाऊन सदर घटनेची माहिती दिली.
सपकाळ यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती गावातील ग्रामस्थांना दिली असता यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव, बाबुराव जाधव, जेसीबी चालक आकाश जाधव व इतर ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली. त्यानंतर जेसीबीला व गाडीला दोर बांधून गाडी तोंडाकडून अलगद उचलून काढण्यात यश आले. सदर घटनेत गाडीचे नुकसान झाले असले तरी सपकाळ कुटुंबीय सुखरूप आहे.
दरम्यान, सदर पुलाची दुरूस्ती तात्काळ करण्याची गरज आहे. सदर रस्ता प्रतापगडावरून सुरू होवून प्रतापगड, वाड्यावरून पार चतुरबेट, दूधगाव, झांजवड, देवळी, कळमगाव, कोट्रोशी, आमशी, हरचंदी, वेळापूर, पाली, उतेकर वाणवली ते तापोळा अशा गावांदरम्यान वाहतुकीसाठी वापरला जात असून साधारणतः पंचवीस ते तीस गावे सदर रस्त्यावर अवलंबून आहेत.