कराड प्रतिनिधी : कराड – चिपळूण महामार्गावरील विहे (ता. पाटण) गावच्या हद्दीतील विहिरीत भरधाव क्रूझर गाडी कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. संपूर्ण गाडी विहिरीत बुडाल्याने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढन्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आज सकाळी गाडीतील मृतदेह पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढला.
संभाजी पवार (रा. मल्हारपेठ, ता. पाटण) असे विहिरीतून बाहेर काढलेल्या मृत चालकाचे आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चालक संभाजी पवार हे कराडकडून मल्हारपेठकडे क्रूझर गाडी (MH-11 A 6261) घेऊन निघाले होते. रात्रीचा अंधार असल्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी अचानक रस्त्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळली. विहिरीत पाणी जास्त असल्याने संपूर्ण गाडी पाण्यात बुडाली. गाडीचे भाडे रद्द झाल्याने कराडहून परत मल्हारपेठला जात असताना हा अपघात झाला. गाडीचा आवाज आला असता परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली.
या अपघाताची माहिती मल्हारपेठ पोलिसांना मिळताच ग्रामस्थ व मल्हारपेठ पोलिसांनी विहिरीमध्ये गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोल पाण्यात गाडी बुडाल्याने याबाबत काही अंदाज लागत नव्हता. अखेर विहिरीतून अपघातग्रस्त गाडी काढण्यासाठी क्रेन बोलविण्यात आली. विहे ग्रामस्थ आणि पोलिसांनी क्रेनच्या मदतीने विहिरीतून गाडी वर काढली. गाडी वर काढण्यात आल्यानंतर गाडीचा क्रमांक (एमएच- 50 ए- 6261) असल्याचे निदर्शनास आले. मात्र, गाडीमध्ये कोणीही आढळून न आल्याने या अपघातातील लोकांची संख्या समजू शकत नव्हती.
रात्री उशिरापर्यंत विहिरीमधील पाण्यामध्ये अपघातग्रस्तांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. अखेर अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. आज सकाळी पुन्हा मल्हारपेठ पोलिस व स्थानिकांनी पुन्हा शोधकार्य सुरू केले असता विहिरीत मृतदेह आढळून आला. मृत्यू झालेल्या चालकाची माहिती काढली असता तो मल्हारपेठ येथील संभाजी पवार यांचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.