सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील केळवली भागात फिरण्यासाठी गेलेला कराड तालुक्यातील सैदापूर येथील २२ वर्षीय ऋषिकेश कांबळे हा युवक धबधब्यात पाय घसरून पडल्याची घटना आठवडाभरपूर्वी घडली होती. यानंतर संबंधित युवकाचा शोध घेण्याचे काम केले जात होते. दरम्यान, धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या ऋषिकेशचा मृतदेह आज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सच्या युवकांनी पोलिसांच्या मदतीने बाहेर काढला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराडमधील ऋषिकेश कांबळे हा रविवार दि. ३० जून रोजी सुट्टीनिमित्त आपल्या मित्रांसमवेत केळवली धबधबा पाहण्यासाठी गेला होता. त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले. ऋषिकेशलाही पोहण्याचा मोह आवरला नाही. तोही पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. धबधब्यात तरूण बुडाल्याची माहिती मिळताच रविवारी दुपारी शिवेंद्रसिंहराजे रेस्कयु टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तासभर शोध घेतला.
पाण्याच्या दाबामुळे बोटीमध्ये पाणी शिरले त्यानंतर रेस्क्यू टीमने गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित युवक आढळून आला नाही. त्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती. आज दुपारी संबंधित बुडालेला युवकाचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहासोबत धबधब्यापासून काही अंतरावर काही नागरिकांना तरंगताना दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती शिवेंद्रसिंहराजे रेस्कयु टीम व पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर रेस्कयु टीमचे सदस्य आणि पोलीस घटनस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला.