नीरा नदीत बुडालेल्या परप्रांतीय फरसाण विक्रेत्याचा मृतदेह सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रात परप्रांतीय फरसाण विक्रेता बुडाल्याची घटना काल सोमवारी घडली होती. या घटनेनंतर रेस्क्यू टीम व पोलीस प्रशासनाद्वारे विक्रेत्याचा शोध घेण्याचे काम सुरु होते. दरम्यान, आज संबंधित बुडालेल्या विक्रेत्याचा मृतदेह शोधण्यास २८ तासानंतर यश आले. सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, मुळ रा.आग्रा उत्तरप्रदेश,सध्या रा.संगमवाडी जि.पुणे) असे मृत्यू पावलेल्या विक्रेत्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता यात्रेकरिता उत्तरप्रदेश येथील फरसाण विक्रीकरिता साधारणपणे २० ते २५ व्यक्ती आले आहेत. दरम्यान, काल, सोमवार नीरा नदी पात्रात अंघोळीकरिता संबंधित विक्रेते गेले असता सुरेंदर शिकरवार बुडाला होता. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस, रेस्क्यू टिमसह घटनास्थळी शोधमोहीम राबविली.

मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे सुरेंदर याचा मृतदेह शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, आज मंगळवार पुन्हा सकाळी शिरवळ रेस्क्यू टीम व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सहाय्याने शोधमोहीम राबविली असता शिरवळ रेस्क्यू टिमचे गोरख जाधव यांना सुरेंदर याचा मृतदेह सापडला. शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.