कराड प्रतिनिधी | खराडे, ता. कराड येथे कृष्णा नदीत गणपती विसर्जन करताना 21 वर्षीय गणेश संतोष जाधव हा बुडाला होता. त्यानंतर त्याचे शोधकार्य राबविण्यात आले असता त्याचा मृतदेह काल सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शोध पथकाच्या हाती लागला. दुपारी एक वाजता त्याच्यावर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळच्या सुमारास गणेश घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कृष्णा नदीत गेला असताना नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याला पोहता येत नव्हते. कराड पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या शोध पथाकडून नदीत शोधकार्य करण्यात आले. रात्री नऊ वाजेपर्यंत नदीच्या पाण्यात शोध पथकाची शोध मोहीम सुरू होती.
मात्र, रात्री अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती. त्यानंतर काल पुन्हा शोधकार्य करण्यात आले असता सहा वाजता परत मोहीम सुरू करण्यात आली. कृष्णा नदीत गणेश बुडालेल्या ठिकाणापासून खालील बाजूस 550 मीटरच्या अंतरावर त्याचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. त्यानंतर दुपारी एक वाजता स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.