कराड प्रतिनिधी | कराड बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एम. टी. देसाई हे अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवडून आले. दरम्यान, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या पदांची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे मंगळवारी अध्यक्षपदासाठी मतदान झाले. दुपारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला.
कराड बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. एम. टी. देसाई आणि ॲड. पी. के. पाटील आमनेसामने होते. मंगळवारी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. दुपारी ३ पर्यंत मतदानाची वेळ होती. एकूण ३११ मतदारांपैकी ३०५ जणांनी मतदान केलं. मतमोजणीत ३ मते अवैध ठरली. ॲड. एम. टी. देसाई हे ५२ मतांनी विजयी झाले.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान उपाध्यक्ष पदासाठी ॲड. श्रीकांत दिवटे, सचिव पदासाठी ॲड. साईप्रसाद पाटील आणि खजिनदार पदासाठी ॲड. शुभम जाधव यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ विधीज्ञांसह सहकारी वकिलांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. अभयसिंह पाटील, ॲड. माणिकराव माने, ॲड. अशोक पाटील, ॲड. दीपाली ढोबळे यांनी काम पाहिले.