जिल्ह्यात 21 व्या पशुगणनेला सुरुवात; गाय, म्हैस, शेळ्याची संख्या किती? घेतली जातेय ॲपद्वारे माहिती संख्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नुकतीच पशुगणना करण्यास पशु संवर्धन विभागाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात २२६ प्रगणक व ५४ पर्यवेक्षक यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्याद्वारे मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना प्रत्यक्षात केली जात आहे. पशु संवर्धन विभागाकडे यापूर्वी असलेल्या नोंदीनुसार यामध्ये गायीची संख्या ३ लाख ५२ हजार ४३६, म्हैशी ३ लाख २६ हजार ८९६, शेळ्या ३ लाख ६४ हजार ३४८, मेंढ्या १ लाख ८५ हजार ९०५ तसेच डूक्कर ३१३ इतकी संख्या आहे.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत दर पाच वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. सदर पशुगणनेमध्ये १६ प्रजातीच्या पशुधन व कुकुटादी पक्षी जात, लिंग व वय निहाय गणना करण्यात येत आहे. दि. २५ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेल्या पशुगणना मोहीम हि दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. सदर पशुगणनेसाठी जिल्ह्यात २२६ प्रगणक व ५४ पर्यवेक्षक यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले आहेत. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी तीन हजार घरांमागे एका पदवीधारक प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

पशुगणनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रनिहाय कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर-कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या जिल्ह्यात आढळणाऱ्या १६ पशुधन प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातिनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे.

देशात १९१९ पासून दर ५ वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे. २०१९ मध्ये २० व्या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती व ग्रामीण आणि नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली. २० व्या पशुगणनेच्या अहवालानुसार राज्यामध्ये एकूण ३ कोटी ३० लाख ८० हजार पशुधन असून मागील पशुगणनेच्या तुलनेत १.८३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

‘या’ प्राण्यांच्या घेतल्या जात आहेत नोंदी

कुटुंब घरगुती उद्योग व इतर संस्थांकडून पाळलेल्या गायवर्ग, म्हसवणे, मिथुन, याक, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती आणि कुक्कुट पक्षी जसे की कोंबडे-कोंबड्या, बदक, टर्की आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग तसेच इतर कुक्कुटपक्ष अशा सोळा प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी करण्यात येत आहे. तसेच भटकी कुत्री, गटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांची देखील माहिती गोळा करण्यात येत आहे.

जिल्ह्यात २२६ प्रगणक व ५४ पर्यवेक्षककांकडून पशुगणना : डॉ. दिनकर बोर्डे

प्रशिक्षण देण्यात आलेले प्रगणक घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन पशुगणना करत असून घरोघरी जाऊन पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबतचे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.

जिल्ह्यात सध्या इतकी आहे गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याची संख्या

सातारा जिल्ह्यात सध्या पशु संवर्धन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या जनावरांची संख्या ही लाखांच्या संख्येने आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर आढळतात. पशु संवर्धन विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार यामध्ये गायीची संख्या ३ लाख ५२ हजार ४३६, म्हैशी ३ लाख २६ हजार ८९६, शेळ्या ३ लाख ६४ हजार ३४८, मेंढ्या १ लाख ८५ हजार ९०५ तसेच डूक्कर ३१३ इतकी संख्या आहे.

पशुगणना पुढील ५ वर्षासाठी अत्यंत उपयुक्त

राज्यामध्ये नुकतीच २५ नोव्हेंबरपासून केंद्र पुरस्कृत २१ वी पशुगणना सुरू करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाकरिता अत्यंत महत्त्वाची गणना असून सदर गणने मधून प्राप्त होणारी माहिती पुढील पाच वर्ष नियोजन, धोरणात्मक निर्णय व विविध योजनांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे २१ वी पशुगणना तात्पुरती स्थगित

देशात पशुगणनेला सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात होणार होती. परंतु आपल्या राज्यातील विधानसभा निवडणूक, ॲपमधील तांत्रिक अडचणी आणि वरिष्ठ पातळीवरून पशुगणनेचे आदेश न मिळाल्यामुळे हि पशुगणना स्थगित करण्यात आली होती. निवडणूक संपल्यानंतर आता २५ नोव्हेंबरपासून २१ व्या पशुधन गणनेला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे.

प्राण्यांची वर्गवारी, जात व छायाचित्रासह

यंदा मोबाइलमधील ॲपद्वारे गणना केली जात आहे. प्राण्यांची वर्गवारी, जात यासंदर्भातील छायाचित्रासह माहिती अॅपमध्ये आहे. पाळीव कुत्रे, भटके कुत्र्यांची माहिती नोंदवली जात आहे. दूध डेअरी, मटण व चिकन विक्रीच्या दुकानांसह त्यांच्याकडील माहितीची नोंद केली जात आहे. त्यासाठी राज्य पशुगणना अधिकारी व जिल्हा पशुगणना अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.