सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशा देणारी योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे, याची जाणीव घेऊन ‘जलतारा’ योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतर्गत राबविण्यात येणार आहे.
या योजनेतून शेतशिवारांत ‘जलतारा’ (शोषखड्डा) खोदण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. प्रत्येक एक एकर क्षेत्रामागे एक ‘जलतारा’ तयार करण्याचे नमूद आहे, ज्यामुळे पाणी जमिनीत मुरले जाईल आणि भूजल पातळी वाढीस मदत होणार आहे. शेतकऱ्यांना या कामासाठी ४८०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे, हे अनुदान महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून दिले जाईल.
‘जलतारा’ खोदण्याची प्रक्रिया सोपी आहे. शेतात पाण्याचा निचरा करण्यासाठी ५ बाय ५ फूट आकाराचा शोषखड्डा खोदला जाईल. या शोषखड्ड्यात मोठे, मध्यम आणि छोटे दगड याचे आच्छादन करून पुन्हा भरले जाईल, ज्यामुळे पाणी जमिनीत मुरले जाईल. सातारा जिल्ह्यात १ हजार ४९२ ग्रामपंचायती आहेत आणि जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ७४ हजार ८५० ‘जलतारा’ खोदण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
या योजनेसाठी शेतकऱ्यांकडे जॉबकार्ड, आधारकार्ड, सातबारा उतारा, आठ-अ, ग्रामपंचायतीचा ठराव, बँक खाते क्रमांक अशा कागदपत्रांची आवश्यकता राहणार आहे. कोरडवाहू शेती असल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होते, मात्र ‘जलतारा’ योजनेमुळे शेतकऱ्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.