सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील धनगर प्रवर्गातील इ. 1 ली ते 5 वी मध्ये इंग्रजी माध्यमाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑफलाईन पद्धतीने सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातारा येथे ऑफलाईन पद्धतीने दि. 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक संतोष जाधव यांनी केले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता शहरातील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत सातारा जिल्हयामध्ये गुरूकृपा कॉन्व्हेंट स्कूल, पाचगणी इंटरनॅशनल स्कूल पाचगणी व ब्ल्यु डायमंड इंग्लिश मिडियम स्कूल लोणंद या तीन शाळांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.
तरी सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी धनगर प्रवर्गातील इ.1 ली ते 5 वी मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता त्यांच्या पालकांनी सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत मोफत शिक्षणाचा लाभ घेता येणार
सदर प्रवेशाकरिता अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्म प्रमाण पत्र,जातीचे प्रमाणपत्र,आधार कार्ड व पालकांचे रक्कम रू.1 लक्ष च्या मर्यादेतील उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य इ. सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सदर शाळांमधील अन्य प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसमवेत एकत्रितपणे शिक्षण दिले जाणार आहे. तसेच सदर शाळांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश मंजूर झाल्यास पुढे बारावी पर्यंत मोफत शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.