सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील नढवळ गावातील येरळा नदी पात्रात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभागाने दि. ३० मार्च रोजी कारवाई केली होती. या कारवाईवेळी मंडलाधिकारी व तलाठ्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी चौघांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. महेश नारायण गोडसे (रा. वडूज, ता. खटाव) असे अटक केलेल्या मुख्य संशयिताचे नाव आहे.
याबाबत वडूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नढवळ येथील येरळा नदी पात्रात दि. ३० मार्च रोजी दुपारी महेश गोडसे व अन्य काहीजण जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने गौण खनिज उत्खनन करतहोते. याची माहिती मिळताच मंडलाधिकारी व तलाठी यांनी तेथे कारवाई केली. या कारवाई दरम्यान महेश गोडसे, हेमंत गोडसे व अन्य काहींनी मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये महसूलचे दोन्ही कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेची मंडलाधिकारी शंकर चाटे यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याप्रकरणातील हेमंत ऊर्फ सोन्या कच्छी, राजेंद्र गोडसे, कांता उमाजी चव्हाण व कुंदन संदिप जगताप यांना पोलिसांनी अटक केली होती, तर मुख्य संशयित महेश गोडसे पसार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना महेश गोडसे घरी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने महेश गोडसे याला अटक केली. गोडसे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.