साताऱ्यातील 195 वर्षांचा ऐतिहासिक महादरे तलाव लागला वाहू; पश्चिम भागाचा पाणीप्रश्न अखेर निकाली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक तलाव, ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत. शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा सुमारे १९५ वर्षांचा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने सहा वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढलयामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झाली आहे. तलाव भरल्यामुळे व्यंकटपुरा पेठेचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.

सातारा शहराच्या आसपास कोणतीही नदी अथवा मोठा तलाव नाही. पाणी असेल तरच एखाद्या गावाचा, शहराचा विकास होतो. ही बाब ओळखून सातारा शहर बसविताना स्थापत्य तंत्राचा कल्पकतेने वापर करून शहरात पाणी खेळवले. ठिक ठिकाणी दगडांचे हौद आणि तलाव बांधले. यातील एक तलाव म्हणजे महादरे होय. प्रतापसिंह महाराज थोरले यांनी १८२९ रोजी महादरे तलावाची उभारणी केली. संपूर्ण दगडी बांधकाम असलेला हा तलाव स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. दोन दशकांच्या कालावधी प्रथमत: सातारा पालिका व जलसंपदा विभागाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी तलावातील गाळ बाहेर काढण्यात आला.

या तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे ४ कोटी ७२ लाख ५० हजार लिटर इतकी आहे. मात्र गाळामुळे केवळ ४ कोटी २२ लाख ५० हजार लिटर इतका पाणीसाठा होत होता. गाळ काढण्यात आल्याने यामध्ये पुन्हा ५० लाख लिटरने वाढ झाली आहे. सातारा सर्व परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे हत्ती व महादरे हे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

शिलालेखावर आदेश…

महादरे तलावाच्या दर्शनी भागात एक शिलालेख असून, त्यावर ‘सातारा शहर म्युन्सिपल कमिटी, या तळ्यात धुण्याची व अंघोळ करण्याची तसेच हर एक प्रकारे पाणी खराब करण्याची सक्त मनाई आहे, सर्वांस कळावे,’ असा मजकूर कोरण्यात आला आहे. ही माहिती मराठी व इंग्रजी भाषेत आहे.