सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये सध्या विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने अनेक पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदीप झणझणे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात “आमदार बदलायाचाय” हा ट्रेंड प्रदीप झणझणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला होता. याच प्राश्वभूमीवर प्रदीप झणझणे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित कार्यक्रमात प्रदीप झणझणे यांचा प्रवेश माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, भाजपा फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे – पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे – पाटील, राजेंद्र काकडे, विकारांत झणझणे, विशाल नलवडे यांच्यासह विविध कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.