सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमधील आंबेनळी घाटात आज दुपारी मोठी अपघाताची भीषण दुर्घटना घडली. महाबळेश्वरकडून प्रतापगडाकडे निघालेल्या टेम्पो आंबेनळी घाटातील सुमारे 400 फूट दरीत कोसळला. मेटतळे या गावाजवळ टेम्पो दरीत कोसळल्याने घाटातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. महाबळेश्वर ट्रॅकरच्या युवकांनी दरीतून 2 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वरकडून प्रतापगडाकडे एक टेम्पो आंबेनळी घाटातून आज दुपारच्या सुमारास निघालेला होता. घाटमार्गे टेम्पो जात असताना तो अक वळणावर घाटातील सुमारे 400 फूट दरीत अचानक कोसळला. टेम्पोत प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून महाबळेश्वर ट्रॅकर्सच्या युवकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास तत्काळ सुरुवात केली.
महाबळेश्वरकडून प्रतापगडाकडे जात असताना टेम्पो घाटात कोसळताना घाटातून प्रवास करणाऱ्यांनी ही दुर्घटना पाहिली आणि प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रवाशांसह टेम्पो 400 फूट दरीत कोसळल्याची माहिती पोलीस प्रशासनास मिळाल्यानंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. तर ट्रेकर्सच्या पथकातील युवकांनी दोन जणांना बाहेर काढले. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती ट्रेकर नीलेश बावळेकर यांनी दिली.