कराड विमानतळ परिसरात साडे दहा किलो गांजा जप्त, दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | गणेशोत्सवाच्या काळात गांजासारख्या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. कराड विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सव आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट असलेल्या पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे दहा किलो गांजा जप्त करण्यात आलाय. राहूल मोरे आणि निखील थोरात, अशी संशयितांची नावे असून दोघेही कराड तालुक्यातील आहेत. कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या विजापूर-गुहाघर महामार्गावर कराड विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात अंमली पदार्थाची वाहतूक

कराडहून पाटणकडे दोघेजण दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी निघाले असल्याची माहिती कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला खबऱ्याकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कराडच्या विमानतळ परिसरात सापळा रचला. एका दुचाकीवरून आलेल्या दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे साडे दहा किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि दुचाकी आणि दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं.

गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या आदेशानुसार कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी अंमली पदार्थाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्या पथकातील आनंदा जाधव, मोहसीन मोमीन, हर्षल सुखदेव यांनी खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे कराड विमानतळ परिसरात गांजा वाहतूक करणाऱ्यांना सापळा रचून पकडले.