कराड प्रतिनिधी | कराड शहरात मुस्लिम बांधवांकडून उद्या रविवारी, दि. २२ रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा केला जाणार असून शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या बदलाच्या अनुषंगाने शुक्रवारी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी शहरात पाहणी करुन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
कराड शहरात रविवारी निघणाऱ्या मिरवणुकीमुळे वाहतुकीत तसेच पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शहरातील पीर हजरत दर्गा, चावडी चौक, नेहरु चौक, आझाद चौक, दत्त चौक, विजय दिवस चौक, जनता बँक, टाऊन हॉल पूर्व बाजू, प्रभात टॉकीज, पालकर वाडा, जोतिबा मंदिर, कन्या शाळा, कमानी मारुती, पीर हजरत दर्गा या मिरवणूक मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश करण्यास अथवा पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोल्हापूर नाका व कृष्णा नाका बाजूकडून कराड शहरात कृष्णा घाट व शुक्रवार पेठेकडे जाणारी वाहतूक कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, भेदा चौक, विठामाता चौक, एलआयसी ऑफिस, कॉटेज हॉस्पिटल, कृष्णा नाका, नागोबा मंदिर, मंगळवार पेठ, स्मशानभूमी, कुंभारवाडा, सोमवार पेठ जनकल्याण बँक, कृष्णा घाट, सात शहीद चौक, शुक्रवार पेठ या मार्गाने वळविण्यात आली आहे. कन्हऱ्हाड शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनधारकांनी या बदलाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.