सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी घाट (Pasrani Ghat) हा सध्या मृत्यूचा सापळा बनत आहे. या घाटात बुवासाहेब मंदिरानजीक टेम्पो आणि डंपरचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना सोमवारी घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर दोघे गंभीर झाले असून इतर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबात घटनस्थाळावरून मिळालेल्या माहितीनुसार सँड क्रश घेऊन वाईकडून पाचगणीकडे डंपर निघाला होता. तर टेम्पो (एमएच २५ यू ०७१९) हा पाचगणीहून वाईच्या दिशेला निघाला होता. भरधाव वेगात असल्याने टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि घाटातील बुवासाहेब मंदिरानजीक असणाऱ्या वळणावर घाट चढणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरचालक जखमी झाला तर टेम्पोमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पोचालकाने गाडीतून उडी मारल्याने तो बचावला.
अपघातानंतर टेम्पोचालकाने घटना स्थळावरून धूम ठोकल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू होते. यावेळी वाई आणि पाचगणीच्या दोन्ही दिशेला वाहनांची मोठी रांगा लागली होती. तर बघ्यांचीही गर्दी झाली होती. तब्बल ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांनी यश आले. या घटनेमुळे प्रवाशांना आपल्या वाहनात ताटकळत बसाने लागले.