कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या चोरीचा टेम्पो चालकच निघाला मास्टरमाईंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांदाच्या विक्रीतून मिळालेली १८ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरी करणाऱ्या तीन युवकांना २४ तासाच्या आत अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेली १७ लाख ९९ हजार ४० रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.

या कारवाईत गणेश मच्छिंद्र ताकवणे (वय २८, रा. पारगाव, ता. दौड, जि. पुणे), अजय भारत भोले (वय २५, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे), अन्सार उरमान शेख (वय २१, रा. नानगाव, ता. दौंड, जि. पुणे) तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी बेळगाव येथे कांद्याची विक्री करून टेम्पोमधून प्रवास करीत गावी जात असताना रविवार, दि. ३ रोजी पहाटेच्या सुमारास वाढे (ता. जि. सातारा) येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी काही जण चहा पिण्यासाठी गाडीतून उतरले होते, तर काही जण गाडीत झोपलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने टेम्पोमधून पैसे ठेवलेली बॅग चोरी करून तेथून पसार झाले होते. चोरी झालेल्या बॅगेमध्ये १८ लाख ६० हजार रुपये होते. रक्कम ठेवलेली बॅग चोरी झाल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांना साताऱ्याहून लोणंद मार्गे पुण्याकडे प्रवास करत असताना समजले.

त्यानंतर त्यांनी पुन्हा सातारला येऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन चोरी झाल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल नोंद करण्यात आला. या घटनेबाबत पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या सूचनेनुसार सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनेची माहिती घेऊन टेम्पोचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना विसंगत उत्तरे दिल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्याच्याकडे अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांना वाढे फाटा येथे बोलावून घेतले.

त्यांच्याकडे रोख रक्कम असलेली बॅग चोरी करून दिल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे इतर दोन युवकांची माहिती गोळा करून त्यांच्या शोधार्थ एक पथक दौंड तालुक्यात जावून त्यांनी ठिकठिकाणी छापे टाकून गुन्ह्यातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. गणेश मच्छिंद्र ताकवणे (वय २८, रा. पारगाव, ता. दौड, जि. पुणे), अजय भारत भोले (वय २५, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे), अन्सार उरमान शेख (वय २१, रा. नानगाव, ता. दौंड, जि. पुणे) अशी केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांनी चोरी केलेल्या रकमेपैकी १७ लाख ९९ हजार ४० रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त केली आहे. गुन्हा घडताच पोलिसांनी चोरी करणाऱ्या तीन युवकांना तात्काळ ताब्यात घेऊन चोरी झालेली रककम हस्तगत केल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सातारा पोलीस दलाचे अभिनंदन केले आहे.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार सुजित भोसले, निलेश जाधव, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल संतोष घाडगे, रोहित पवार, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष कचरे, सुशांत कदम यांनी ही कारवाई केली आहे.