कोयनानगरमध्ये टेम्पो- दुचाकीची समोरासमोर धडक; 2 तरूण जागीच ठार तर 1 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातार्‍यातील पर्यटनस्थळ असलेल्या कोयनानगरजवळ शुक्रवारी रात्री आयशर- दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले असून एक तरूण गंभीररित्या जखमी झाला आहे. धीरज बनसोडे, प्रणय कांबळे, अशी मृतांची नावे आहेत. दुचाकी चालक प्रसाद कदम हा तरूण गंभीर जखमी असून त्याच्यावर पाटण ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

धोकादायक वळणावर अपघात

कोयनानगरनजीकच्या गोषटवाडी गावच्या हद्दीत एका धोकादायक वळणावर आयशर टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. वाहनांची धडक होताच दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी तरूणाला तातडीने पाटण ग्रामीण रूग्णालयात उपचारसाठी दाखल केले. अपघातानंतर तरूणांच्या नातेवाईक, मित्रमंडळींनी पाटण ग्रामीण रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.

तरूणांच्या मृत्यूने कोयना परिसरावर शोककळा

कोयना विभागातील प्रसाद आनंदा कदम (वय 23, रा. तोरणे), प्रणय उत्तम कांबळे (रा. हुंबरळी), धीरज संतोष बनसोडे (वय 18, मूळ रा. नाशिक, सध्या रा. कोयनानगर) हे तिघेजण दुचाकीवरून कोयनानगरकडे निघाले होते. गोषटवाडी गावच्या हद्दीतील एका धोकादायक वळणावर समोरून आलेल्या आयशर टेम्पोची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. त्यात तिघेही रस्त्यावर पडले. या अपघातात दोन तरूण जागीच ठार झाले. प्रसाद कदम हा दुचाकी चालवत होता. तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोवळ्या वयात दोन तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याने कोयना परिसरावर शोककळा पसरली आहे.

कोयनेत पर्यटकांची गर्दी

सध्या पावसाळी पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे विकेंडला कराड-कोयनानगर मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याचे चित्र पाहायला मिळते. चिपळूणच्या लोटे एमआयडीसीमुळे या मार्गावर अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते. केमिकलची वाहतूक करणारे अवजड टँकर, कोकणात भाजीपाला घेऊन जाणारे टेम्पो अशा वाहनांमुळे धोकादायक वळणांवर अपघात घडतात. शुक्रवारी रात्री अपघात झालेल्या वळणावर यापुर्वीही भीषण अपघात झाले आहेत. त्यामुळे ते धोकादायक वळण अपघाताचा ब्लॅक स्पॉट बनला आहे.