सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर तालुक्यातील सर्व खातेदार शेतकरी यांना कळविणेत येते की, महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक एकत्रि-२०२१/प्र.क्र.४७/ल-१ दि. ८ ऑगष्ट २०२३ अन्वये महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम (१९४७ चा ६२) याच्या कलम ५ च्या पोट-कलम (३) अन्वये महानगरपालिका व नगरपरिषदा यांच्या नगरपालिका हददीमध्ये समाविष्ट असलेली क्षेत्रे वगळता, प्रमाणभूत क्षेत्राची अनुसूची प्रसिध्द केली. यामधील अ.क्र.७ अन्वये सातारा जिल्हयामध्ये जिरायत २० आर व बागायत १० आर याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे, अशी माहिती महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. ०८ ऑगष्ट २०२३ नुसार निर्धारीत केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे वगळता उर्वरित ७/१२ वरील इतर हक्कात असलेल्या “तुकडा” शेरे कमी करणेबाबतची कार्यवाही पुर्ण करावी असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार महाबळेश्वर तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडून प्राप्त अहवाललानुसार पुढील गावी तुकडा नोंद असलेचे शेरे ७/१२ संख्यानिहाय व गावनिहाय कमी करणेत आले आहेत.
दाभेमोहन-४४, दाभेदाभेकर-२१, शिरणार १०, खरोशी ६३, घोणसपूर-१८, बिरवाडी- ८८, कासरुड- ४, मेटतळे ५३, हातलोट ४५, जावली ४९, हारोशी ४५, कुंभरोशी- ३०, दरे- ४३, रानआडवागौंड ६, शिरवली २७, पारसोंड १९, पारपार १८, पेठपार २, बिरमणी- ३, कुमठे – १५, दुधोशी- १, दरे तर्फ तांब ३, चतुरबेट १३, दुधगाव २०, कळमगाव १२, झांजवड १०, देवळी-३९, गोरोशी- १ महाबळेश्वर तालुक्यातील एकूण २८ गावामधील आजअखेर ७०२ सातबारा वरील शेरे कमी करण्यात आले आहेत. उर्वरित गावांचे तुकडा शेरे कमी करण्याची कार्यवाही सुरू आहे. याबाबत महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदार यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेशी संपर्क साधून दुरुस्त ७/१२ घेण्यात यावा, असेही आवाहन तहसीलदार श्रीमती पाटील यांनी केले आहे.