वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांच्या ‘या’ प्रश्नासाठी प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदार सांगली जिल्ह्यात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । वांग – मराठवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे सुमारे १२ ते १५ वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यात शिवाजीनगर तोंडोली, नेवरी तसेच विटा तालुक्यात कार्वे, माऊली, कलंबी आदी ठिकाणी पुनर्वसन झाले होते. त्या ठिकाणी सदर प्रकल्पग्रस्त कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या पाटण तालुक्यातील गावात त्यांची मतदार यादीत नावे तशीच आहेत. ती नावे कमी करण्यासाठी आज पाटणचे तहसीलदार व प्रांताधिकारी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात दाखल झाले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तेथील मतदार यादीतील नावे कमी करण्याचे काम हाती घेतले आहे.

वांग मराठवाडी प्रकल्पातील प्रकल्प ग्रस्तांचे सुमारे १२ ते १५ वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यात शिवाजीनगर तोंडोली,नेवरी ,तसेच विटा तालुक्यात कार्वे, माऊली,कलंबी आदी ठिकाणी पुनर्वसन झाले होते. दरम्यानच्या काळात यातील काही प्रकल्पग्रस्त मयत देखील झाले आहेत तर काहींची पुढची पिढी देखील आली आहे.

हे सर्व असले तरी देखील मूळ मतदार यादीत त्यांचे सुमारे ५०० ते ६०० नावे तशीच होती. या प्रकल्पग्रस्तांनी ही नावे कमी करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. परंतु नावे काही कमी झालेली नव्हती. त्यामुळे ही बाब प्रकलपग्रस्तांच्या स्थानिक संघटने मार्फत स्थानिक तहसीलदार व प्रांताधिकारी यांचे निदर्शनास आणून देण्यात आली.प्रकल्प ग्रस्तांची मागणी योग्य असल्याने त्यानुसार जिल्हाधिकारी सातारा यांनी याबाबत प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

अनेक वर्षांची मागणी होणार लवकरच पूर्ण

त्यानुसार पाटण तहसीलदार रमेश पाटील व प्रांताधिकारी सुनील गाढे हे आपल्या बीएलओ तसेच तलाठी मंडल अधिकारी यांच्या फौज फाट्यासह सांगली जिल्ह्यात आज दाखल झाले. वांग मराठवाडी प्रकल्पातील सुमारे ५०० ते ६०० मतदारांची नावे कमी करण्यासाठी प्रत्यक्ष त्यांचे वसाहतीमध्ये जाऊन नावे कमी करण्यासंदर्भात कार्येवाही करण्यात आली. अनेक वर्षांची ही मागणी या निमित्ताने मान्य होत असल्यामुळे याबाबत प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात देखील जाऊन त्यांचे दारी पोहचल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती.

राज्यातील पहिलाच प्रकार

प्रकल्प ग्रस्तांची मतदार यादीतील नावे कमी करण्यासाठी अन्य जिल्ह्यात जाऊन थेट त्यांचे पुनर्वसन केलेल्या वसाहतीमध्ये तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी भेट देण्याचा प्रकार हा बहुधा राज्यातील पहिलाच प्रकार असल्याने याबाबत पाटण तहसीलदार रमेश पाटण व उपविभागीय अधिकारी पाटण सुनील गाढे यांचे कार्यपद्धतीबाबत प्रकल्पग्रस्तांनी समाधान व आनंद व्यक्त केला.