चक्क फलक फाडून ‘त्यानं’ अल्पवयीन मुलीचा फोटो पळवला; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्यांची संख्या भलतीच वाढली आहे. त्यांच्याकडून छेडछाडीसह आता मुलींच्या शाळेचे फलक फाडून मुलींचे चोरून फोटो काढले जात आहेत. अशा छेडछाड करणाऱ्या आगाशिवनगर येथील संबंधितांवर उपविभागीय पोलीस कार्यालयातील निर्भया पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आगाशिवनगरच्या हनुमाननगर परिसरातील एका मुलासह त्याच्या साथीदाराने अभिनंदनाच्या फलकावरील एका मुलीचा फोटो कापून तो पळवला. हा प्रकार पालकांसह स्थानिक नागरिकांना समजताच त्यांनी संताप व्यक्त करत उपअधीक्षक ठाकूर यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. स्कूल प्रशासनानेही याची दखल घेत पोलिसांना कारवाईबाबतचे पत्र दिले. उपअधीक्षक ठाकूर यांनी तत्काळ कारवाईच्या सूचना देखील दिल्या.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या दीपा पाटील, अमोल फल्ले, संतोष सपाटे, सागर बर्गे, प्रवीण पवार, दीपक कोळी यांनी फलक फाडणारांचा शोध घेण्यास सुरूवात केली. संबंधित मुलगी रस्त्यावरून जाताना ही मुले लपून तिचे मोबाईलवर फोटो काढत असल्याचेही पोलीस चौकशीत समोर आले. संबंधित मुलासह त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

तत्काळ केली तक्रार दाखल

कराड तालुक्यातील आगाशिवनगर येथील एका शाळेच्या विविध स्पर्धांत यश मिळवलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अभिनंदनाचा डिजीटल फलक लावला होता. हा फलक फाडून त्यावरील एका अल्पवयीन मुलीचा फोटो छेडछाड करणाऱ्यांनी पळवला असल्याची घटना नुकतीच घडली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पालकांसह शाळा प्रशासनाने कराड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दाखल केली. यानंतर निर्भया पथकाच्यावतीने छेडछाड करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. त्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली. अवघ्या २४ तासात निर्भया पथक व पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पालकांसह शाळा प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.