कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क झाले असताना जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकास दिली. त्यानुसार याबाबतची माहिती संबंधित पथकाने आज पुणे जिल्हा न्यायालयास दिली आहे. त्यानुसार संबंधित दहशतवाद्यांवरील दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) कलमवाढ करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)ने मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर दोघांची आज पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना आज मंगळवारी (ता. 25) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यावेळी पथकाने न्यायालयात दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दिली. पथकाने केलेल्या तपासात देशविघातक कारवाई करण्याचा उद्देश असल्याचे पेन ड्राईव्हमधून आले समोर आले आहे. तसेच दोघेही आयसिसच्या अल सुफा संघटनेशी संबंधित असल्याचे देखील समोर आले आहे. पेनड्राईव्ह मधून निघालेल्या माहितीचा 436 पानांचा तपास अहवाल न्यायालयात सादर केला. त्यानंतर सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांबरोबर असलेला त्यांचा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने जेव्हा दोघांच्या घरामध्ये छापा टाकला तेव्हा त्यांना घरामध्ये विविध वस्तू आढळून आल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटकच असल्याचे एक्स्प्लोसिव्ह वेफर डिटेक्टर मध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या डॉग स्कॉडने देखील यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ही पावडर नेमके कोणते स्फोटके आहे, त्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला असून त्याचा अहवाल आलेला नाही. त्याचा अहवाल आल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.