जिल्ह्यातील भावी गुरुजी देणार 13 केंद्रांवर परीक्षा; 10 नोव्हेंबर रोजी देणार पेपर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने दि. १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सातारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

राज्यातील पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागावण्यात आले होते. रविवार दि. १० नोव्हेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. पेपर क्रमांक १ सकाळी १०.३० ते १ व दुपारच्या सत्रात पेपर क्रमांक २ हा २.३० ते ५ दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. या परीक्षेसाठी ८ हजार ४४२उमेदवार बसले आहेत.

जिल्ह्यातील साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज, लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय, महाराजा सयाजीराव विद्यालय, श्रीपतराव पाटील हायस्कूल, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, अनंत इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, छत्रपती शाहू अॅकॅडमी, सुशीलादेवी कन्या प्रशाला, अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भवानी विद्यामंदिर, न्यू इंग्लिश स्कूल सातारा या १३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत परीक्षा नियोजनावर चर्चा करण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर प्रवेशासाठी प्रवेशपत्राशिवाय मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, शाळा महाविद्यायलयाचे अद्ययावत ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.