सातारा प्रतिनिधी | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २०२४-२५ वर्षासाठी सातारा जिल्ह्याला ४ हजार ६०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामुळे लाभार्थ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे.
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून बेघर, कच्ची घरे असणाऱ्या ग्रामीण भागातील कुटुंबांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणची २०१६ पासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्याला १४ हजार २७१ घरकुलांचे उद्दिष्ट होते. मंजुरीनंतर १३ हजार ८२६ घरकुले बांधून पूर्ण झालीत.
तर अनुदान देऊनही ४४५ लाभार्थ्यांनी घरकुले अपूर्ण ठेवलेली आहेत. यामुळे ५ कोटी ३४ लाखांचे अनुदान अडकून पडलेले आहे. त्यातच जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये प्रतीक्षा यादीत अजून ५७ हजार ७४० लाभार्थी आहेत.
आता या योजनेमधील ग्रामीण टप्पा २अंतर्गत जिल्ह्याला २०२४-२५ वर्षासाठी ४ हजार ६०० कुटुंबांसाठी घरकुल देण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. प्रतीक्षा यादीतील लाभार्थी २०२४-२५ वर्षातील उद्दिष्टाप्रमाणे घरकुल मंजुरीसाठी पात्र आहेत. अशा व्यक्तींची यादी लवकरच तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरही प्रसिद्ध होणार आहे. निकषानुसार अपात्र निदर्शनास आल्यास त्यांची नावे वंगळण्यात येणार आहेत. पात्र घरकुल मंजुरीसाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवायचा आहे, असेही सांगण्यात आले आहे.