पाऊस पडताच जिल्ह्यातील 77 गावे अन् 263 वाड्यांतील टॅंकर झाले बंद मात्र, ‘इतक्या’ गावात 148 टॅंकर सुरूच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यात सुरु असलेली टॅंकरची संख्या कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील १४१ गावे आणि ४५३ वाड्यांत पाणी टंचाईची स्थिती असून या गावात १४८ टॅंकरने तहान भागवण्याचे काम सुरु आहे. २ लाख १७ हजार ५९१ नागरिक आणि १ लाख ५५ हजार ७४० पशुधनास टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

सध्या टंचाईची दाहकता अजुनही माण तालुक्यात आहे. माणमध्ये अजुनही ७० टॅंकर सुरू आहेत. तर खटाव तालुक्यात १७, फलटणला २५, कोरेगाव तालुक्यात २४, खंडाळा १, वाई तालुक्यात ७, जावळीत १ आणि कराड तालुक्यात ३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मागील सहा महिन्यांपासून दुष्काळाने होरपळणाऱ्या जिल्ह्यात मान्सूनने आनंद आणला असून सर्वदूर पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता कमी झाली आहे. मागील आठवड्यापासून तब्बल ७७ गावे आणि २६३ वाड्यांतील ६० टॅंकर बंद झाले आहेत.

सध्या १४८ टॅंकरवर १४१ गावे आणि ४५३ वाड्यांची तहान अवलंबून आहे. तरीही माणमधील अजुनही ४६ गावे आणि ३१४ वाड्यांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्केही पाऊस झाला नव्हता. तसेच जिल्ह्यातील एकाही तालुक्याने १०० टक्क्यांची सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे पश्चिम भागातील बहुतांशी धरणे भरली नव्हती. तसेच कोयना धरणातही कमी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी झळा सुरू झाल्या होत्या.

परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गहन झालेला. त्यामुळे अनेक गावांना टॅंकर सुरू होते. तर बहुतांशी गावांना मार्च महिन्यापासून टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागलेला. त्यानंतर दिवसेंदिसें वस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत गेली. मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात तब्बल २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. यासाठी २०८ टॅंकरचा धुरळा उडत होता. तर या टॅंकरवर २ लाख ३३ हजार नागरिक आणि अडीच लाखांहून अधिक पशुधन अवलंबून होते. यामध्ये माणमध्येच टंचाई अधिक होती. तालुक्यातील ७१ गावे आणि ४४५ वाड्यांतील लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. ८८ टॅंकरवर सवा लाख लोकांची तहान अवलंबून होती. यानंतर खटाव तालुक्यातही टंचाई वाढलेली. ५५ गावे आणि १४५ वाड्यांसाठी टॅंकर सुरू करण्यात आलेले. मागील आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने टंचाई एकदम कमी झाली आहे.