सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात हळू हळू उन्हाचा पारा वाढू लागला असून वातावरणात उकाडा जाणवू लागला आहे. परिणामी जिल्ह्यातील गावोगावी पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील 7 गावे व 70 वाड्या वस्त्यांमधील 14 हजार नागरिकांना आपली तहान टँकरच्या पाण्यावर भागवावी लागत आहे.
सातारा जिल्ह्यात असलेल्या धरणे, छोट्या मोठ्या तलावामध्ये यंदा पुरेसा पाणी साठा झाला. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कडक उन्हाळा जिल्ह्यात जाणवू लागला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली असून पाणी टंचाईबरोबर चार्याचीही टंचाई जाणवू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
मार्च महिन्यामध्ये जर अशीपरिस्थिती असेल तर पुढील एप्रिल व मे महिन्यात दुष्काळाचे भीषण सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माण तालुक्यातील बिजवडी, मोही, धुळदेव, वरकुटे-म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, जाशी या 7 गावासह 70 वाड्या-वस्त्यांमधील 14 हजार 34 नागरिक व 9 हजार 952 जनावरांना 10 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.