सातारा प्रतिनिधी | भारत-पाकिस्तान यांच्यात 1971 साली झालेल्या युद्धात समावेश असलेला टी 55 हा रणगाडा सातार्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात (हुतात्मा चौक) रविवारी पहाटे दाखल झाला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी स्वत: पहाटे चार वाजता उपस्थित राहून याबाबतची कार्यवाही करून घेतली. संरक्षण दलात 38 वर्षे कामगिरी केल्यानंतर निवृत्त झालेला हा रणगाडा खा. उदयनराजेंच्या विशेष प्रयत्नातून सातारा पालिकेला मिळाला आहे.
पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांना आतंकवाद्यांना कंठस्नान घालताना हौतात्म्य आले. देशाबद्दल अपार निष्ठा बाळगणार्या अशा सैन्य अधिकारी व सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सातारा नगरपालिकेने शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाची उभारणी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात हुतात्मा स्मारक असलेल्या जागेत हे वैशिष्ट्यपूर्ण असे उद्यान बांधण्यात आले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी या उद्यानाचे काम पूर्ण केले. नेताजी सुभाषचंद्र बोस या चौकाचे सुशोभिकरण सातारा पालिका करत आहे.
याच चौकात भारत-पाकिस्तान यांच्यात 1971 साली झालेल्या युद्धात समावेश असलेला टी 55 हा रणगाडा रविवारी पहाटे दाखल झाला. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे उपस्थित होते. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून पुण्यातून हा रणगाडा सातार्यात दाखल झाला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सातारा पालिका या रणगाड्यासाठी आवश्यक कट्टा तयार करत होती. या कट्ट्याचे काम पूर्ण झाल्याने खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर हा रणगाडा दाखल झाल्याने सातारकरांना सुखद अनुभव आला.
संपूर्ण रशियन बनावटीच्या असलेल्या या रणगाड्याने सैन्य दलात 38 वर्षे सेवा केली. 24 फेब्रुवारी 2009 रोजी या रणगाड्यातून शेवटच्या तोफा डागण्यात आल्या होत्या. त्यानंतर सैन्यदलातून हा रणगाडा निवृत्त केल्यावर पुण्यात ठेवण्यात आला होता. सध्या सातार्यात आणलेला हा रणगाडा सातारकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता. सैनिकांचा जिल्हा अशी ओळख असणार्या सातार्याच्या शिरपेचात खा. उदयनराजे भोसले यांच्यामुळे मानाचा तुरा रोवला गेला. सातार्याला टी 55 हा रणगाडा मिळावा यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले.