कराड प्रतिनिधी । स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी अशी कराड तालुक्यातील तांबवे या गावाची ओळख आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून अनेक घडामोडी घडल्या. मात्र, आता तांबवे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते म्हणजे तांबवे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाच्या एका प्रकरणामुळे. तांबवे ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे, विठोबा पवार व अन्य सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नुकताच एक तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तांबवे ग्रामपंचायतीच्या वहिवाट आणि कब्जातील जमिनीच्या खरेदी दस्ताला हरकत न घेता विद्यमान सरपंच आणि उपसरपंचाने स्वत:च्या फायद्यासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या हिताविरूध्द कृत्य करून गंभीर अपराध केला आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 प्रमाणे त्यांच्या बेकायदेशीर कृत्याची तातडीने चौकशी करावी, त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सदस्यांनी अर्जाद्वारे केली आहे.
सदस्यांनी दाखल केलेल्या अर्जात म्हंटले आहे की, तांबवे ग्रामपंचायतीच्या मालकीची सि.स. नं. 505 क्षेत्रफळ 207.35 चौ. मी. (सध्या खुली असलेली जागा) मिळकत ग्रामपंचायतीकडे पुर्वीपासून वहिवाटीस होती व आहे. गावाचा सिटी सर्वे होण्यापुर्वी सि. स. नं.505 या मिळकतीमध्ये पाण्याची टाकी अस्तित्वात होती. त्या अनुषंगाने सिटी सर्वे नकाशा व चौकशी नोंद वहीत पाण्याची टाकी स्पष्टपणे दाखवलेली होती. सिटी सर्वे रेकॉर्डला तांबवे ग्रामपंचायतीची नोंद आहे. याची संपूर्ण माहिती सरपंच शोभाताई शिंदे व उपसरपंच विजयसिह पाटील यांनी दिली होती. सिटी सर्व्हे रेकॉर्डला शशिकला कृष्णत जंगम वगैरे लोकांची नावे पोकळ असल्याचा गैरफायदा घेवून सि. स. नं. 505 ही मिळकत वैभव बाळकृष्ण पाटील यांना ता. 12/10/2022 रोजी शशिकला कृष्णत जंगम वगैरेंनी खरेदी दस्ताने हस्तांतरीत केली.
प्रत्यक्षात सदर मिळकतीचा कब्जा हा तांबवे ग्रामपंचायतीचा असल्याने तो कसल्याही प्रकारे वैभव बाळकृष्ण पाटील यांना दिलेला नव्हता व त्यांनीही तो कधी घेतलेला नव्हता व नाही. या मिळकतीत पहिल्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायतीचाच अखंडपणे कब्जा वहीवाट चालत आलेली होती व आहे. ता.12/10/2022 च्या तथाकथीत खरेदीपत्रास ग्रामपंचायत तांबवे यांची कसलीही संमत्ती अगर परवानगी न घेता तथाकथीत बेकायदेशीर, विना कब्जाचा, विना मालकीचा, खरेदीपत्राचा दस्त वैभव बाळकृष्ण पाटील यांनी अस्तित्वात आणला असल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
खरेदीदार वैभव बाळकृष्ण पाटील यांनी तथाकथीत खरेदीपत्रावरून सिटी सर्व्हे रेकॉर्ड नोंदीसाठी अर्ज केला. त्यावरून सिटी सर्वे अधिकार्यांनी ग्रामपंचायतीला नोटीस काढली. परंतु, सरपंच, उपसरपंचाने अन्य सदस्यांना कसलीही माहिती न देता वैभव बाळकृष्ण पाटील यांचेशी संगनमत करून संबंधित नोटीशीच्या अनुषंगाने नोंदीस कसलीही हरकत घेतली नाही. खरेदीपत्राच्या नोंदीस हरकत न घेतल्याने वैभव बाळकृष्ण पाटील यांच्या नावाची नोंद सिटी सर्व्हे रेकॉर्ड दफ्तरी झालेली आहे. सरपंच, उपसरपंच यांनी स्वत:च्या फायद्यासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून ग्रामपंचायतीचे हिताविरूध्द कृत्य करून गंभीर अपराध केला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे आणि पर्यायाने ग्रामपंचायतीचे नुकसान झाले आहे.
या सर्वाला सरपंच आणि उपसरपंच हे जबाबदार असून त्यांच्या बेकायदेशीर कृत्याला ग्रामपंचायत कर्मचार्यांनीही सहकार्य केले असल्याने त्यांच्या विरूध्दही कारवाई करावी. तसेच सरपंच आणि उपसरपंच यांचे सदसत्व रद्द करून त्यांना पदावरून कमी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे आणि विठोबा पवार यांनी अर्जात केली आहे.
लवकरच योग्य तो खुलासा करू : विजयसिह पाटील
सदरची मिळकत हि वहिवाटीची आहे ग्रामपंचायत मालकीची नाही. ग्रामपंचायतीचे नाव इतर हक्कात आहे. तथापि सदर जागेचा कोणी खरेदी दस्त करत असेल तर त्याला आमचा सर्वांचाच विरोध राहील. ग्रामपंचायत मालकीच्या कसल्याही जागेत आम्ही कोणाला काहीही करू देणार नाही. या सर्व प्रकाराला आमचा विरोधच आहे. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडून आमच्याशी ज्यावेळी पत्रव्यवहार होईल त्यावेळी आम्ही योग्य तो खुलासा करू, अशी प्रतिक्रिया तांबवे गावचे उपसरपंच विजयसिह पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.