सातारा प्रतिनिधी । उत्तर कोरेगाव मधील देऊर येथील तळहिरा तलाव यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ओव्हर फ्लो झाला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे परिसरातील पाणी प्रश्न मिटला असून बळीराजा सुखावला आहे.
गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र दुष्काळ परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये येथील तळहिरा तलाव पूर्ण कोरडा पडला होता. त्यामुळे परिसरातील देऊर, तळीये, वाठार स्टेशन तेथील शिवारातील सर्व विहिरी आटल्या होत्या. त्यामुळे परिसरात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. जनावरांना चारा तसेच पाणीटंचाई भासली होती.
शासनाने टँकरद्वारे केलेला पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने लोकांना खाजगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली होती. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस पावसाचे जोरदार आगमन झाले. जाधववाडी, फडतरवाडी, विखळे या भागात समाधानकारक उन्हाळी पाऊस झाल्याने येथील पाझर तलाव, साखळी बंधारे पाण्याने पूर्ण भरले होते.
वेळेत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी घेवडा, सोयाबीन वाटाणा, तसेच आल्यासारखी पिके घेतली. पुढे मोसमी पावसाने हे तलाव तसेच ओढेनाले वाहू लागले. त्यामुळे आज अखेरीस पूर्णपणे आटलेला तळहिरा तलाव दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा पुढील दोन वर्षाचा पाणी प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.