शिरवळ जवळ ट्रॅव्हल्स-कंटेनर अपघातात टाळगावचा युवक ठार, चौघेजण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीत घडली. यामध्ये सुरज भीमराव शेवाळे (वय 27, रा.टाळगाव शेवाळेवाडी, ता. कराड) जागीच ठार झाला असून चारजण जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून-सांगली जिल्ह्यातील चांदोली याठिकाणी ज्योर्तीलिंग कृपा ही खासगी ट्रँव्हल्स लक्झरी बस (एमएच क्रं. 01 डीआर 0108) निघाली होती. बसमध्ये 43 प्रवाशी प्रवास करीत होते. दरम्यान, बस सातारा जिल्ह्यातील शिरवळ गावच्या हद्दीत महामार्गावर एका हाँटेलसमोर आली असता एक मालट्रक वळण घेत असताना कंटेनर (एनएल क्रं.01 जी 4069) ला पाठिमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॅव्हल्समध्ये पुढे बसलेल्या एकाच जागीच मृत्यू झाला तर चालकासह चार जण जखमी झाले.

यामध्ये सूरज भीमराव शेवाळे (वय 27, रा. टाळगाव, ता. कराड) आपल्या पत्नीसमवेत प्रवास करीत होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील व्यवस्थापक अकुंश बापूसो पाटील (वय 42, रा. पणुंबरे जि. सांगली), प्रवाशी राजश्री अनिल मोरे (वय 29 रा. कराड), शंकर आनंदा बगाडे (वय 45, रा.बत्तीस शिराळा जि.सांगली), अमित महादेव पवार(वय 29, रा. किंद्रेवाडी जि.सांगली) हे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती शिरवळ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार तुषार कुंभार, सुजित मेंगावडे व शिरवळ रेस्क्यू टिमचे सदस्य घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी जखमींना शिरवळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुरज शेवाळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. चालक केरबा सवणे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला अपघाताची फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार हे करीत आहेत. या अपघाताची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.