तळबीड पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील 3 तस्करांना केली अटक, 1 कोटीचे मांडूळ जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मांडुळाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना तळबीड पोलिसांनी जेरबंद केले आहे. रुपेश अनिल साने (रा. आड, ता. पोलादपूर), अनिकेत विजय उत्तेकर आणि आनंद चंद्रकांत निकम (दोघेही रा. कापडखुर्द, ता. पोलादपूर, जि रायगड), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १० लाख रुपये किंमतीचे मांडूळ पोलिसांनी जप्त केले आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील एका हॉटेलच्या आवारात शुक्रवारी (दि. १६) रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

शिवजयंती आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर गस्त सुरू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी रात्री तळबीड पोलीस गस्तीवर होते. यावेळी महामार्गावरील वराडे गावच्या हद्दीतील जय शिवराय हॉटेल जवळ काही लोक मांडुळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि कॉन्स्टेबल निलेश विभुते यांना मिळाली.

खबऱ्याच्या माहितीवरून तळबीड पोलिसांनी जयशिवराय हॉटेलच्या आवारात सापळा रचला. रात्री नऊच्या सुमारास तीन जण मोटार सायकलवरुन हॉटेलसमोर येवून थांबले. पोलिसांनी घेराव घालून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॉक्समध्ये मांडूळ आढळून आले. आनंद चंद्रकांत निकम याला दहा दिवसांपूर्वी शेतात काम करताना मांडूळ सापडले होते. ते १ कोटी १० लाख रुपये किंमतीला विक्रीसाठी घेवून जात होतो, अशी कबुली संशयितांनी दिली.

तिन्ही संशयितांवर वन्यजीव प्राणी अधिनियमान्वये तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मांडूळ कराड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीडचे सहा्य्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, उपनिरीक्षक अशोक मदने, सहाय्यक फौजदार काळे, आप्पा ओंबासे, पोलीस नाईक भोसले, संदेश दिक्षीत, पो.कॉ. निलेश विभुते, सुशांत कुंभार, महेश शिंदे यांनी ही कारवाई केली.