कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदी, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. जिल्ह्याती सहा धरणांमध्ये देखील मुबलक पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्या कारणाने प्रशासनाकडून देखील अतिवृष्टीच्या काळात सतर्क राहत उपाययोजना आखल्या जात आहेत. कराड तालुक्यात देखील नदीकाठच्या गावात पाणी जाऊन पूर स्थिती निर्माण होत असते. याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कराड तहसील कार्यालयात तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या उपस्थितीत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याची आढावा बैठक पार पडली. यावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पूर परिस्थितीच्या काळात सतर्क राहावे, अशा सूचना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केल्या.
कराड येथील प्रशासकीय कार्यालयात पार पडलेल्या संभाव्य पूरस्थिती अनुषंगाने आढावा बैठकीस तशीलदार कल्पना ढवळे, युवराज पाटील यांच्यासह पोलीस, पालिका, पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दि.07/07/2025 रोजी सातारा जिल्ह्याच्या पूरपरिस्थतीबाबत आढावा घेतला होता. यावेळी मंत्री देसाई यांनी तालुका प्रशासनाने सर्व विभागाचा आढावा घ्यावा, अशा सूचना दिल्या होत्या. पालकमंत्री देसाई यांनी दिलेल्या सूचनेनुसार कराड तालुक्यातील प्रहसकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली.
या आढावा बैठकीत कराड तालुक्यामध्ये कोणतीही जिवीतहानी तसेच पशुधनहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी संबंधित विभागांना दिल्या. तसेच जर जीवीतहानी, पशुधनहानी झाली तर त्याचा पंचनामा करून तात्काळ महसूल विभागाकडे सादर करावा अशा सुचना दिल्या. महसूल विभाग, कराड- मलकापूर नगरपरिषद, पंचायत समिती आणि महावितरण यांनी एकमेकांचे संपर्कात राहुन पूरपरिस्थितीबाबत नियोजन करावेत, पंचायत समिती आरोग्य विभाग तसेच उपजिल्हा रुग्णालय यांनी साथीच्या रोगांवरील औषधोपचारांचा तसेच सर्पदंशावरील औषधांचा मुबलकसाठा ठेवावा, सर्व ओढे नाले यांची स्वच्छता करुन गावातील रस्त्यावर तसेच महामार्गावर पाणी साचून वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना अधिकाऱयांनी केल्या.
पुराच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर बैठका घेऊन जनजागृती करा
यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे यांनी ग्रामसेवक, तलाठी तसेच ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील महत्वाच्या सूचना केल्या. मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांनी गाव पातळीवर बाइतका घेऊन पूर स्थिती उदभवल्यास कोणती काळजी घ्यावी, पूरामुळे स्थलांतरित होणाऱ्यासाठी शाळांमध्ये लाईट, पाणी व स्वच्छतागृहाची सोय करणेबाबत शिक्षण विभागास सूचना केल्या. तसेच तालुका प्रशासनाच्या नियंत्रण कक्षामध्ये (02164-222212) या क्रमांकावर पूर काळात आपत्ती उध्दभवल्यास माहिती देणेबाबत आवाहन करण्यात आले.