सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य दारुची विक्री तसेच शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या कार्यरत होत्या. या ३ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी २ वर्षाकरीता तडीपार केले.
टोळी प्रमुख १) शकीला गुलाब मुलाणी, (वय ६०), २) अमीर गुलाब मुलाणी, (वय ३७), ३) समीर गुलाब मुलाणी, (वय ३३), (सर्व रा. टिटवेवाडी (देशमुखनगर) ता. जि. सातारा) यांच्यावर दुखापत पोचवुन शिवीगाळ दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अवैद्य दारुची चोरटी विक्री करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन गर्दी मारामारी करणेबाबतचे गंभीर गुन्हे दाखल होते.
दरम्यान, बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी आर.जी. तेलतुंबडे, सहा. पोलीस निरीक्षक, बोरगांव पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा किरणकुमार सुर्यवंशी यांनी केली होती.
टोळीमधील इसमांना दाखल असलेलया गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आले होते. तसेच बाहेर आल्यानंतर वेळोवेळी त्यांचेवर अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही. तसेच त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच थाक न राहिल्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा इसमांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीस पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे समोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासुन १८ उपद्रवी टोळयांमधील ६१ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर, पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, बोरगांव पोलीस ठाणेचे पोहवा दादा स्वामी, पो.ना. प्रशांत चव्हाण, पो. को. विशाल जाधव यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.