सातारा प्रतिनिधी | सातारा येथील डॉ. सुभाषचंद्र बोस चौक परिसरात सातारा नगरपालिकेच्या वतीने शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारक विकसित करण्यात आले आहे. या स्मारकाच्या परिसरात एकात्मिक सेना मुख्यालयाच्या वतीने शौर्यवाहन म्हणून ‘टी 55’ रणगाडा ठेवला जाणार आहे. पुणे येथील संरक्षण दलाच्या खडकी मुख्यालयाकडून याबाबतचे आदेश प्राप्त झाले असल्याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या शाहू नगरीला दैदीप्यमान इतिहास व शौर्याची परंपरा आहे. हा जिल्हा सैनिकांचा जिल्हा आहे, त्यांच्या पराक्रमाला तोड नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरात शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती स्मारक विकसित करण्यात आले आहे. याच चौकामध्ये सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून भारतीय सैन्याकडे असलेला टी 55 हा रणगाडा युद्धवाहन स्मारक म्हणून सातारा नगर परिषदेला उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती.
संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्यामुळे पुणे येथील खडकी मुख्यालयाकडून हा युद्ध संरक्षण रणगाडा मंजूर झाला असून तो लवकरच सातारा नगरपालिकेसाठी उपलब्ध होणार आहे.हा रणगाडा सीएएफडी खडकी येथून सातारा नगर परिषदेला सुपूर्द केला जाणार आहे. या रणगाड्याची दैनंदिन देखभाल सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
रणगाडा वितरणाचे आदेशपत्र खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना दिले. हुतात्मा स्मारक चौक परिसरात ‘टी 55’ रणगाडा बसवला गेल्यानंतर या परिसराला वेगळी झळाळी मिळणार आहे. या कामी नवी दिल्ली येथील सेना भवन, आर्मीचे एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय तसेच सातारा जिल्ह्यातील आजी माजी सैनिक यांचे सहकार्य लाभल्याचे उदयनराजे आवर्जून सांगितले.