सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील काही व्यक्ती मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. या आरोपांचे खंडन करत असे कृत्य करणाऱ्या गावगुंडांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी सातारा स्वराज्य कामगार संघटनेकडून पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सातारा पालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे मोठे योगदान असून, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच हे काम केले जात आहे. पुतळा परिसर सुशोभित करण्यासाठी पालिकेने ठेकेदार नेमला आहे.
या ठेकेदारीवरून व पैशांच्या कारणावरून दोन गट तयार झाले आहेत. त्यांच्या मनातील सूडभावना इतकी उफाळून आली आहे की, त्यांनी पालिका प्रशासन व मुख्याधिकाऱ्यांची बदनामी सुरू केली आहे. या आरोपांचे कर्मचारी संघटना खंडन करत आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर संघटनेचे उपाध्यक्ष संदीप पाटसुते, कपील मट्टू, लक्ष्मण कांबळे, उत्तम कोळी, चेतन देडगे, अमोल खंडझोडे, प्रशांत गाडे, प्रकाश नवले, सचिन मस्के, नागेश आवळे आर्दीच्या सह्या आहेत