सातारा प्रतिनिधी | सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे अस्तित्व आजही टिकून आहे. येथील गड, किल्ले, दुर्ग, दऱ्या-खोऱ्या, ऐतिहासिक स्थळे त्याची साक्ष देतात. शिवरायांची थोरवी गाणारा हा शिवकालीन इतिहास जाणण्यासाठीच सातारा तालुक्यातील भाटमरळी येथील सुपुत्र, साहसी गिर्यारोहक स्वप्नील श्रीरंग जाधव याने १८०० फूट खोलीच्या कोकण कड्यावर रॅपलिंग केलं आहे.
गेली १० वर्षे सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकंती करणाऱ्या स्वप्नील श्रीरंग जाधव यांनी दीडशे हून अधिक गड – किल्ले, दुर्ग आणि व्हॅली यांच्या मोहिमा फत्ते केल्या आहेत. अंगावर शहारे आणणारी सांधण व्हॅली, माहुली गड परिसरातील प्रसिद्ध वजीर सुळका, मोरोशीचा भैरवगड, लिंगाणा, तैलबैला, कळकराय सुळका, वानरलिंगी सुळका, सह्याद्रीच्या कुशीतील कोकण कड्यावर रॅपलिंग व क्लाईंबिंगचा थरार त्यांनी अनुभवला आहे.
एक हजार फूट उंचीच्या या सह्याद्रीतील प्रचंड रौद्र अशा कोकणकड्यावरून स्वप्नील जाधव यांनी २० मिनिटांत रॅपलिंग पूर्ण केले. पाचणाई येथून पहाटे चार वाजता हरिश्चंद्रगड चढण्यास सुरुवात केली. सकाळी सहा वाजता गडावर पोहचला व त्या दिवशीच दिवशी सकाळी सात वाजता कोकण कड्यावर पोहोचले.
सकाळी अकराच्या दरम्यान स्वप्नील जाधव यांनी कोकणकड्या वरून रॅपलिंग करायला सुरुवात केली. पहिला ९०० फुटांचा टप्पा पार करायला दहा मिनिटे लागली. हा टप्पा पूर्ण ओव्हरहॅंग म्हणजे, लटकत खाली जाणे असा आहे. दुसरा टप्पा हा ६०० फुटांचा आहे. तो त्याने सात मिनिटांत पार केला. तिसरा टप्पा ३०० फुटांचा आहे. हा टप्पा तीन मिनिटांत पार केला.